Thursday, 28 November 2019

नमस्कार मित्रांनो , हिंदी एक उत्तम भाषा आहे आणि ती मला पूर्णपणे समजते पण ती लिहिता बोलता नीट येत नाही, अनेक लोकांमध्ये एक संभ्रम आहे की हिंदी भारताची राष्ट्रभाषा आहे पण भारताच्या संविधानात राष्ट्रभाषा नावाचा उल्लेख ही केला गेला नाही. गुजरात कोर्टाने ही मान्य केलं की हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, मुळात भारताला कुठली राष्ट्रभाषा नाही मात्र हिंदी ही इतर एकवीस भाषांप्रमाणे ही एक अधिकृत भाषा आहे. एक देश एक भाषा असण्याचे फायदे आहेतच पण भारत हे विविधतेने नटलेले एक संघ राज्य आहे त्यामुळे ' एक देश एक भाषा ' या गोष्टीचा प्रश्नच उद्भवत नाही. 
            दक्षिणात्य राज्यात हिंदीला मोठ्या प्रमाणात विरोध होतो हे आपण दूरदर्शन तसेच Twitter , YouTube वर पाहतोच. परंतु तो अराजकीय की राजकीय हित साधून केलेला विरोध असतो याची मला तरी पुर्णतः जाण नाही. जरी राजकीय असला तरी त्याचा परिणाम आणि लोकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता लोकांच्या मनात हिंदी विषयी द्वेष निर्माण झाला आहे हे जाणवते. 
            स्वातंत्र्य पूर्व काळापासून केंद्रात हिंदी भाषिकांचा दबदबा आहे हे जगजाहीर आहे. त्यामुळे केंद्राकडून अहिंदी राज्यात हिंदी लादण्याची टीका सातत्याने होत आली आहे. सरकारी कामकाज आणि भारतीय लोहमार्ग यंत्रणा म्हणजेच रेल्वेमध्ये ही हे चित्र प्रत्येक्षात बघण्यास मिळते. 
            हिंदी भाषेच्या प्रचारामध्ये बॉलीवूडचा खूप मोठा वाटा आहे. अमेरिकेतील हॉलिवूड आणि इंग्रजांचा तोंडातून पडलेल्या बॉम्बए शब्दापासून बॉलीवूड शब्दाची निर्मिती झाली. बॉलीवूडची सुरुवात तशी मराठी चित्रपटांपासून झाली परंतु हळू हळू मराठी चित्रपटापेक्षा हिंदी चित्रपटांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत गेली आणि बॉलीवूडची ओळख हिंदी चित्रपट म्हणून झाली! नाईलाज म्हणावा की दुर्दैव पण एकही भटकंती, विज्ञान किव्हा क्रीडा वाहिनी सध्या तरी मराठीत उपलब्ध नाही. मराठी बोला चळवळ, मराठी एकीकरण समिती तसेच वयक्तिक पातळीतून यासाठी अथक प्रयत्न सुरूच असतात पण वाहिन्या हवा तसा प्रतिसाद देत नाही!
         अजून एक सांगायला लाज वाटेल पण लहानपणी मला मराठीपेक्षा हिंदी जवळची वाटतं होती. तसे कारण ही ते होतेच, व्यंगचित्रपट(कार्टून) मराठी प्रेमींच्या प्रयत्नानंतर सोनी टीव्हीने मराठीत व्यंगचित्रपट दाखवण्यास सुरुवात केली आहे पण आमच्या वेळी फक्त हिंदी इंग्रजी आणि काही दाक्षिणात्य भाषांमध्ये दाखवले जायचे. घरातले मंडळी मराठी आणि हिंदीत दूरदर्शन बघायचे ! त्यामुळे हिंदी थोडीफार समजू लागली. हळू हळू उमजयला लागलं. साडे चार वर्षे झाली एकही हिंदी चित्रपट बघितलेला नाही, पण हे चित्रपट मला माझ्या मातृभाषेत बघायला नक्कीच आवडतील.
           चला मग इथे तुमची रजा घेतो आणि आपण सर्व मराठीसाठी नेहमीच तत्पर राहाल हीच अपेक्षा ठेवतो पुन्हा भेटू आपण आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तात्पुरता जय महाराष्ट्र